चंद्रपूर- शहरात शुक्रवारी रात्री आढळलेल्या एका अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला. या अस्वलाला जेरबंद करण्यात वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर सहा तासांच्या सलग पाठलागानंतर वनविभागाने या अस्वलाला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
हेही वाचा- कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक
शुक्रवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास शहरातील संजय गांधी मार्केट जवळ एक अस्वल दिसून आले. यापूर्वीही याच ठिकाणी अस्वल दिसले होते. याची माहिती संबंधित वनविभाग आणि इको प्रो. संघटनेला देण्यात आली. वनविभागाचे पथक आणि इको प्रो.चे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. मात्र, या अस्वलाने पथकाला चांगलेच थकवले.
संजय गांधी मार्केट, पाण्याची टाकी, जिल्हाधिकारी कार्यालय, बंगाली कॅम्प, शास्त्री नगर असा प्रवास बिथरलेल्या अस्वलाने केला. त्याचा वनविभागाचे पथक सातत्याने पाठलाग करीत होते. मात्र, काही केल्या अस्वल हाती लागत नव्हते. यानंतर हे अस्वल पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परतले. येथेही हे हाती आले नाही. अखेर सहा तासांच्या थरारानंतर सीएचएल हॉस्पिटलजवळ या अस्वलाला गुंगीचे इंजेक्शन मारण्यात आले. यात बेशुद्ध झालेल्या अस्वलाला वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.