चंद्रपुर : घुग्घूस येथील वेकोली रामनगर वसाहतीतील इंजिनियरींगचा विद्यार्थी शुभम दिलीप फुटाणे (25) अपहरण प्रकरण तब्बल महिनाभरानंतर उघडकीस आले आहे. 30 लाखाच्या खंडणीसाठी त्याची जिवंत जाळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या हत्या प्रकरणात घुग्घूस येथील आरोपी गणेश पिंपळशेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो इलेक्ट्रानिक्स इंजिनियरचा विद्यार्थी आहे. आज शनिवारी 13 फेबुवारी 2021 ला हत्या झाल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे.
17 जानेवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शुभम हा मित्रांसोबत चंद्रपूर मार्गावरील जायका हॉटेल मध्ये जेवण करायला बाहेर जातो, असे सांगून दुचाकीने घरून निघाला होता. रात्री बराच वेळ होऊनही शुभम घरी न पोहचल्याने त्याच्या आईने त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. एका अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचे भ्रमणध्वनीवर आईला मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे सांगून 30 लाख रूपये खंडणीची मागणी केली होती. आरोपीने खंडणी दोन दिवसात नाही मिळाली तर मुलाला जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती. तत्काळ या प्रकाराची तक्रार आई वडिलांनी घुग्घूस पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 364 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
यापुर्वी याच आरोपीने केले होते एका मुलाचे अपहरण-
दुसऱ्या दिवशी सकाळी घुग्घूस येथील डॉ. दास यांच्या रुग्णालयाजवळ शुभमची दुचाकी (क्र. एमएच 34 एएस 6815) रस्त्यालगत आढळून आली होती. सदर दुचाकीवर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले. यानंतर पोलिसांनी रक्ताचे नमुने घेवून तपासला गती दिली. यापुर्वी याच आरोपीने एका मुलाचे अपहरण केले होते.
वाहनावरी रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने साम्य-
घुग्घूस येथे 3 नोव्हेंबर 2020 रोजी स्थानिक व्यावसायिका सनी खारकर यांच्या सात वर्षाच्या वीर नामक मुलाचे अपहरण गणेश पिंपळशेंडे या आरोपीने केले होते. परंतु सोशल मिडीयावर या बालकाला वाचविण्यासाठी झालेल्या जनजागृती आणि पोलिसांच्या दक्षतेने नागपुरातून वीर या बालकाला वाचविण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे या प्रकरणातही याच आरोपीवर पोलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे वाहनावरी रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने साम्य आढळून आल्याने पोलिसांचा संशय खात्रीत बदलला. त्यामुळे आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
प्रेत पुर्णत: जळालेल्या अवस्थेत-
आज शनिवारी उपविभागीय अधिकारी नांदेडकर, घुग्घूसचे ठाणेदार राहूल गांगुर्डे यांनी घुग्घूस लगतच्या स्वागत लॉन जवळील घटनास्थळावर आरोपीला घेवून गेले. त्या ठिकाणी शुभम फुटाणे या विदयार्थ्याचे प्रेत पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मिळालेला आहे. फक्त डोक्याची कवठी तेवढी पोलिसांना हस्तगत करता आली. घटनास्थळावरील परिस्थतीवरून त्याची जाळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा विस्तृत तपास सुरू केला असून हत्येची अधिक माहिती लवकरच पुढे येणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवान नांदेडकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
हेही वाचा- ..तर निश्चितच कारवाई होईल; पण ठाम पुराव्याशिवाय कोणाचे नाव घेणे चुकीचे