चंद्रपूर - 'बाळासाहेब, उद्धव साहेबांनी आम्हाला काही कमी पडू दिले नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, खऱ्या शिवसैनिकाच्या रक्तात गद्दारी नाही. बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरे हेच आमचे साहेब, बाकीच्यांचे आम्हाला काही माहिती नाही,' या शब्दात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहण्याची खंबीर भूमिका घेतली आहे. सध्या बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्या गटाला शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) असे नाव दिले आहे. याबाबत जिल्ह्यातील शिवसैनिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आपण सदैव उद्धव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ आहोत, हीच खरी शिवसेना असल्याचे मत व्यक्त केले. ( Shiv Sena Workers Reaction )
उद्धव साहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम - संदीप गिऱ्हे
'शिवसेनेचे सर्व नेते बाळासाहेबांच्या नावानेच निवडून आलेत. जर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे असेल तर त्यांनी बाळासाहेबांचे नाव न वापरता निवडून दाखवावे, उद्धव साहेबांनी आम्हाला याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. उद्धव साहेब यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे,' अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिली.
शिंदेना बाळासाहेबांचे नाव लावण्याचा हक्क नाही - नगरसेवक सुरेश पचारे
'एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी पक्षाशी इमान राखले नाही. मग ते कुठल्या तोंडाने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावत आहेत, त्यांना तो हक्क नाही. शिवसेनेने आम्हाला खुपकाही दिले, त्यात आम्ही समाधानी आहोत. पण ज्याला यातही समाधान नसेल त्याला काही पर्याय नाही. हे म्हणजे असे झाले की एखाद्याला उधारी मागायची असेल तर त्याच्या घरी चोरी करणे आणि मग सांगायचे की माझी उधारी होती, यात काय तथ्य आहे? असेच एकनाथ शिंदे यांचे आहे, जर काही मागायचंच होते तर सेनेत असताना मागायचे होते. आता त्यांच्या भूमिकेला काहीही अर्थ नाही,' अशी प्रतिक्रिया चंद्रपूर मनपाचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी दिली.
ठाकरे परिवारावर इतके आघात झाले पण ते डगमगले नाहीत - बंडू हजारे
'ठाकरे परिवाराचा वारसा संपविण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मात्र बाळासाहेब, उद्धव साहेब कधी डगमगले नाहीत. त्यांनी उलट आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले. पद म्हणजे सर्वकाही नसते, मात्र कार्यकर्त्यांवर कधी अन्याय झाला नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला संधी मिळते. खरा शिवसैनिक असा विचार करतो, मात्र काहींना केवळ पद हवे म्हणून पक्ष सोडून जातात. मात्र त्यामुळे सेना कधी संपणार नाही असा इतिहास आहे.' अशी प्रतिक्रिया सेनेचे माजी नगरसेवक तसेच कंत्राटी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांनी दिली.
बाळासाहेबांचे नाव दिल्याने शिवसेना होत नाही - कैलाश तेलतुंबडे
'बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली, फुलवली. रंजल्या-गांजल्या, गोरगरीब कार्यकर्त्यांना अन्यायाविरोधात लढण्याचे बळ दिले. अशा सामान्य कार्यकर्त्यांना त्यांची जातपात, धर्म न बघता आमदार, खासदार बनवले, त्यांना मंत्री केले. उद्धव साहेब शिवसेना पुढे नेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावल्याने खरी शिवसेना होत नाही, साहेबांचा विचार महत्वाचा. उद्धव साहेब हेच आमचे दैवत बाकी आम्ही कुणाला ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलाश तेलतुंबडे यांनी दिली.
बाळासाहेबांचे नाव न वापरता स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा - निलेश बेलखडे
बाळासाहेबांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने शिवसेना मोठी झाली आहे. शिवसेना आणि हिंदुत्व ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या कोणीही वेगळ्या करू शकत नाहीत. ज्यांना कुणाला दुसरे संघटन तयार करायचे असेल त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ते तयार करावे, त्यात बाळासाहेबांचा उल्लेख करू नये. त्यांना तसा कुठलाही नैतिक अधिकार आता उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश बेलखडे यांनी दिली.