चंद्रपूर : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्त होण्याचा समान अधिकार दिला. मात्र सरकारच्या विरोधात बोलले की, अशा लोकांना लक्ष केले जाते. त्यांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. नुकताच राज मुंगासे याच्यावर एक रॅप केला म्हणून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. 'चोर आले 50 खोके घेऊन गेले' एवढेच तो म्हणतोय, यात कुणाच्या नावाचा, पक्षाचा उल्लेख नाही. 50 खोके ज्यांनी घेतले नाही, तर मग अपमान कशाचा आणि कुणाचा झाला? भीती ही चोरांना असते, जर तुम्ही चोर नाहीत तर आक्षेप घेण्याचे कारण नाही, मात्र तरीही राज मुंगासे या रॅपरवर गुन्हा दाखल केला. याचप्रमाणे इतर काही रॅपरवर देखील असेच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही काही विरोधात बोलला तर तुम्हाला तुरुंगात डांबले जाईल, मला देखील याच पद्धतीने गप्प करण्याचे प्रयत्न झालेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
लोकशाहीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी : लोकशाहीचे स्तंभ खिळखिळे करण्याचे काम सुरू आहे. प्रसार माध्यमांना देखील आता इतके स्वातंत्र्य उरलेले नाही. या काळात सामान्य माणसांची देखील गळचेपी केली जात आहे. सत्याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना धमकावले जात आहे, त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहे. जर लोकशाहीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल, माझे म्हणणे मला मांडू दिले जात नसेल तर या विरोधात मी बंड पुकारेन, या विरोधात मी संघर्ष करणार असे देखील सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता : आपल्या भाषणाच्या समारोपाच्या वेळेस सुषमा अंधारे म्हणाल्या कुणालाही दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मात्र माझ्या भाषणाने देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भक्तांना वाईट वाटले असेल, चुकून त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी अजिबात माफी मागणार नाही. कारण बोलून शब्द बदलायला मी काही चंद्रकांत पाटील नाही, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पुष्पा स्टाईलने दिला प्रतिसाद : पुष्पा या तेलगू चित्रपटाचा 'झुकेगा नही' हा डायलॉग आणि देहबोली संपूर्ण भारतात परिचित आहे. कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही, असे दाखवायचे असल्यास या देहबोलीचा उपयोग केला जातो, सोशल मीडियावर याची क्रेझ आहे. सुषमा अंधारे यांनी देखील आपल्या समारोपीय भाषणात आपण केलेल्या सर्व वक्तव्याबाबत आपण कदापि झुकणार नाही किंवा माफी मागणार नाही, हे दाखवण्यासाठी पुष्पाच्या देहबोलीचा उपयोग करत प्रतिसाद दिला.