चंद्रपूर - गरीब, पीडित, कमजोर वर्गातील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. मात्र, गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ येथे चक्क शासकीय नोकरदारांना घरकुल देण्याचा प्रताप ग्रामपंचायतीने केला आहे. एवढेच नव्हे तर मागील यादीत पक्के घर असल्यामुळे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना या यादीत पात्र करण्यात आले. यामुळे आता खरे लाभार्थी संतापले असून याप्रकरणाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
हे वाचलं का? - एमएसईबीचा सावळा गोंधळ, मनमानी बिलाची आकारणी करत दिले 72 हजारांचे बील
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत खराळपेठ ग्रामपंचायत येते. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 94 नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात आले. पात्र, लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये चक्क शासकीय सेवेत असलेल्या ग्रामस्थांच्या नावाचा समावेश होता. एवढेच नव्हे तर मागील यादीत पक्के घर असल्याने ज्या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले होते. त्यांनाही या यादीत पात्र करण्याचा प्रताप ग्रामपंचायतीने केला आहे. 94 पैकी साधारण ३० घरांबाबत हा प्रकार घडल्याने वंचित लाभार्थी चांगलेच संतापले आहेत.
हे वाचलं का? - घरकूल योजनेसाठी सभापती कल्याणी शिंगणेंचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण
याप्रकरणाची चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी याप्रकरणाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी करून न्याय देण्याची मागणी यशवंत पेंदोर, अनील नागापूरे, योगेश्वर पेंदोर, बंडू लोणारे, गुरुदास चटारे, हरिश्चंद्र खारकर, सावित्राबाई गुडपले, शिवराम वाकुडकर यांच्यासह समस्य अन्यायग्रस्तांनी केली आहे.