चंद्रपुर - वाघांची मुबलक संख्या, मोठया प्रमाणावर असलेल्या वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी शासनाने कन्हाळगाव अभयारण्याची निर्मीती केली. पण येथील वाघांची आता पुरती झोप उडाली आहे. त्याला कारणीभूत ठरले येथील रेतीतस्कर. गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या अधिवास क्षेत्रातील नाल्यातून खुलेआम रेतीतस्करी सुरू आहे. पण वनविभाग झोपेत आहे. तर तालुका प्रशासनाने तस्करांना अप्रत्यक्षपणे जंगल मोकळे करून दिले आहे. यामुळे अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
चिवंडा जंगल हे वाघांच्या अधिवासासाठी-
गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावला शासनाने नुकतेच अभयारण्य घोषित केले आहे. कन्हाळगाव अभयारण्यात येत असलेला चिवंडा जंगल हे वाघांच्या अधिवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. या भागात अनेक वाघांचा अधिवास आहे. याच चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून रात्रो तस्कर रेतीची मोठया प्रमाणावर उपसा करित आहेत. रात्रभर येथे मोठया प्रमाणावर वाहनांची ये-जा असल्याने येथील वाघांची पुरती झोप उडाली आहे. शिवाय वाघांच्या सुरक्षेसाठी ही अतिशय घातक बाब आहे. हा भाग सध्या वनविकास महामंडळात मोडतो. पण या तस्करीकडे वनविभागाचे पुरते दुर्लक्ष होत आहे.
तस्करांना तालुका प्रशासनाचा आशीर्वाद-
तालुका प्रशासनाने या तस्करांना आर्शिवाद दिला की काय अशी परिस्थिती झाली आहे. एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता वरिष्ठ स्तरावरून मोठया-मोठया योजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या आर्शिवादाने वन्यजीवांपुढे नवीनच संकट उभे ठाकले आहे. याप्रकरणी वरिष्टांनी लक्ष दयावे व वन्यजींवांना दिलासा दयावा, अशी मागणी तालुक्यातील वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- पोलिसांनी ठोकल्या पाच चोरट्यांना बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त