चंद्रपूर - चंद्रपूर-मूल महामार्गावर वन्यजीवांचे अपघात सत्र सुरूच आहे. शनिवारी या मार्गावर आणखी एका सांबरचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे वन्यजीव प्रेमींची चिंता वाढली आहे.
महामार्गावर शनिवारी रात्री ८ च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या मामला डेपोसमोर एका सांबराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या महामार्गावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. महामार्ग असल्याने वाहने भरधाव वेगाने चालत असतात. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडताना आजपर्यंत वाघ, बिबट, अस्वल, चांदी अस्वल, हरीण, सांबर, रानगवे, रानटी डुक्कर, मसन्याउद, ससे, सरपटणारे प्राण्यांमध्ये साप, बेडूक, घोरपड, सरडे आणि असंख्य पक्ष्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
मध्यतंरी लोहार संशोधन केंद्राजवळ एका वाघाचा अपघाती मृत्यू झाला होता. मागील वर्षी २४ तासात २ अस्वलांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर वलणी बस स्टॅन्ड समोर २ बिबट, मूल जवळ डोणी फाट्याजवळ दुर्मिळ चांदी अस्वलाचा अपघाती मृत्यू झाला होता.