चंद्रपूर - जिल्ह्यात वाळू तस्करीच्या प्रकरणात काँग्रेस प्रदेश युवक काँग्रेस सचिव सचिन कत्यालवर गुन्हा दाखल झाला. कत्यालच्या अटकेसाठी रामनगर पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. मात्र, कत्याल आणि निशांत आंबटकर अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तर, या प्रकरणी आज दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची वाळू तस्करी करण्यात आली आणि ती अजूनही सुरू आहे. यात अनेकजण गब्बर झाले असून राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने त्यांची हिंमत वाढली होती. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाळू तस्करीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी रामनगर पोलिसांनी अजयपूर जवळ अंधारी नदीतील वाळू तस्करीची मोठी कारवाई केली. यात तुळशीराम देवतळे आणि आदिल खान यांना अटक करण्यात आली. या वाळू तस्करीप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली जेसीबी ही काँग्रेस प्रदेश युवक काँग्रेस सचिव सचिन कत्यालच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तर, कत्यालचे नाव समोर येताच या प्रकरणात वेगळे वळण लागले. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री कत्याल आणि निशांत आंबटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यानंतर कत्याल पोलिसांच्या हाती लागला नाही. यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले. मात्र, अद्याप कत्यालला पकडण्यात यश आलेले नाही.
तर, या प्रकरणात आज दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कत्यालची या वाळू तस्करीत नेमकी काय भूमिका आहे, हे चौकशी अंतीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कत्याल याला अटक कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.