चंद्रपूर - जिल्ह्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल प्रलंबित आहे.
हेही वाचा- मुंबईतील नेपियन सी रोड परिसरातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग
2 मेला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. हा रुग्ण शहरातील कृष्णनगर येथील रहिवासी असून तो चौकीदारीचे काम करायचा. ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तो 1 मेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा कोरोनाचा अहवाल 2 मेला पॉझिटिव्ह आला. यानंतर रुग्णाच्या घराचा परिसर सील करून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
तसेच ज्या इमारतीत रुग्ण चौकीदारी करीत होता ती इमारत सील करण्यात आली. काल रुग्णाची पत्नी, मुलगी आणि मुलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात पत्नी आणि मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर मुलाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. सोबतच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे नमुने देखील पाठविण्यात आले आहेत. मात्र, कुटुंबातील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने चंद्रपुरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.