चंद्रपूर - येथे एका मुलाला ट्रकने चिरडल्याचा घटना घडली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, मृत्यूशी झुंज देताना आज त्याने अखेरचा श्वास घेतला. वेदांत नाईक असे त्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी ट्रक मालक आणि चालक यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप करीत संतप्त कुटुंबीय मुलाचा मृतदेह घेऊन थेट पोलीस ठाण्यावर धडकले. यामुळे रामनगर पोलीस ठाण्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा- 'एसपीजी' सुरक्षा काढण्यात येणार, गांधी कुटुंब आता 'झेड प्लस'मध्ये
26 ऑक्टोबरला वेदांत नाईक हा आपल्या वडिलांच्या दुचाकीवर मागे बसून जात होता. यावेळी अचानक त्याचा तोल गेला. त्यामुळे तो मागून येणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडला गेला. यात वेदांत गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथे काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, यानंतर त्याची तब्येत बिघडल्याने नागपूर येथे हलविण्यात आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारादरम्यान नागपूरच्या पोलिसांनी देखील त्याला आर्थिक मदत केली होती. मात्र, हा अपघात चंद्रपूर येथे घडला असताना रामनगर पोलिसात याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यांनी साधी जखमींची भेट सुद्धा घेतली नाही. तसेच या ट्रकचा अपघात झाला त्याचा मालक जोशी नामक व्यक्ती आहे. त्याच्यावर कुठली कारवाई रामनगर पोलिसांनी केली नाही. उलट चालकाला सुद्धा पोलिसांनी सोडून दिले. असा आरोप वेदांतच्या कुटुंबीयांचा आहे. त्यामुळे मृतदेह घेऊन कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक थेट रामनगर पोलीस स्टेशनवर धडकले. त्यांनी स्टेशनच्या आवारात मृतदेह ठेवून आक्रोश व्यक्त केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दंगा नियंत्रण पथकाला बोलावून नागरिकांचा आक्रोश शमविण्यात आला.