चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीच्या संपर्कातील 7 नातेवाईकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यातील 5 नातेवाईक चंद्रपूर येथील असून 2 नातेवाईक यवतमाळ येथील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात 2 मे रोजी एक आणि 13 मे रोजी एक असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात एकूण 339 नमुने घेण्यात आले असून 304 नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 33 नमुने प्रतिक्षेत आहेत. शहरातील कृष्ण नगर व बिनबा परिसर प्रशासनाने सील केला असून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेला आहे.
आरोग्य विभागाने आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिनांक 2 मे रोजी आढळलेला कृष्णनगर येथील पॉझिटिव्ह रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी दाखल असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यात बिनबा गेट जवळ 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीला सध्या विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती करण्यात आले असून या युवतीची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 699 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे तसेच, गृह अलगीकरण पूर्ण झालेले एकूण 41 हजार 375 नागरिक आहेत, तर सध्या गृह अलगीकरण सुरू असलेले 19 हजार 233 नागरिक आहेत. कृष्णनगर येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या परिसरामध्ये 47 आरोग्य पथकामार्फत 2 हजार 152 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे, तर बिनबा गेट परिसरामध्ये 4 आरोग्य पथकांमार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे.