चंद्रपूर Ravindra Tonge Condition Critical : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे. मात्र, या आंदोलनासाठी सरकारकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्यानं आता ओबीसी समाज आणखी तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघासह इतर ओबीसी संघटना उद्या रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली : मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं.आज उपोषणाच्या बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावलीय. सकाळी त्यांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, साखरेची पातळी कमी झाल्यानं त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र आंदोलनात खंड पडू नये म्हणून त्यांच्याऐवजी आता विजय बल्की, प्रेमानंद जोगी बेमुदत उपोषणावर बसले आहे.
नागपूर मार्गावर रास्ता रोको : या आंदोलनाची सरकारनं अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी मातोश्री विद्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी यावेळी पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. उद्या, शनिवारी जनता महाविद्यालयासमोर नागपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
30 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा बंद : 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर ओबीसी कार्यकर्ते केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घराला घेराव घालणार आहेत. 25 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असून 30 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी बबनराव फंड, दिनेश चोखरे, नंदू नगरकर, ॲड. दत्ता हजारे, गजानन गावंडे, अनिल धानोरकर, अनिल डहाके, रवींद्र शिंदे, नीलेश बेलखेडे, राजेश बेळे उपस्थित होते.
29 सप्टेंबरला शासन करणार चर्चा : ओबीसींच्या विविध मागण्या संदर्भामध्ये राज्य शासनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविले आहे. यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर समन्वयक अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे यांचा समावेश आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडणार आहे.
हेही वाचा -