चंद्रपूर - मूल तालुक्यातील राजगड ग्रामपंचायतीने 45 वर्षावरील नागरिकांचे (100%) लसीकरण पूर्ण केले आहे. राजगड ही ग्रामपंचायत लसीकरणातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
'लसीकरण हा एकमेव पर्याय'
कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सद्यस्थितीत लसीकरण हा एकमेव पर्याय पुढे आला आहे. परंतु, लसीकरणाबाबत विशेषतः ग्रामीण भागात कमी प्रतिसाद बघायला मिळाला आहे. मुल तालुक्यांतर्गत राजगड ग्रामपंचायत मात्र, यासाठी अपवाद ठरली आहे. राजगड ग्रामपंचायतीने यापूर्वी कोरोना काळात गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काय-काय करायला पाहिजे, याचा आदर्श यापूर्वीच ठेऊन दिला होता. आता लसीकरणाचबाबतही संपूर्ण जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
'तालुकास्तरावर सरपंचांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार केले'
ग्रामीण भागात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने लसीकरणाबाबत लोकांमधील गैरसमज विविध मार्गांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी तालुकास्तरावर सरपंचांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार करून, लसीकरणाबाबत थेट सर्व सरपंच्यांशी संवाद साधला. या माध्यमातून जिल्हा स्तरावरून वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राप्त होणारे लसींचे डोस कमीत-कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, याबाबत नियोजन केले. त्याचाच परिणाम म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात आता मोठा प्रतिसाद मिळत आहे.
'कोरोनाविरोधी लढ्यातही सर्वांसमोर एक आदर्श'
राजगडने यापूर्वीच जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून, आपली ओळख तयार केली आहे. आता कोरोनाविरोधी लढ्यातही सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. राजगडचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीनींही 45 वर्षावरील आपल्या नागरिकांचे (100%) लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.