चंद्रपूर - संघमित्रा एक्सप्रेस २२ डबे पाठीमागे सोडून केवळ ३ डब्यांसह पुढे गेल्याची घटना जिल्ह्यातील वरोराजवळ रेल्वे स्थानकाजवळ घडली. रेल्वे इंजिन ५ किलोमीटर पुढे निघून गेल्यावर हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. निसटलेले डबे अनियंत्रित होऊन रुळावरुन घसरण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
पाटणा-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस शनिवारी नागपूरवरून रात्री साडेसहा वाजता निघाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. त्यामुळे 25 डब्यांच्या गाडीचे २२ डबे मागे राहिले. ३ डब्यांना घेऊन इंजिन पुढे गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी ताशी १०० ते १२०किलोमीटर वेगाने धावत होती. डबे वेगळे झाल्यानंतर विनाइंजिन २२ डबे दोन ते तीन किलोमीटर धावत राहिले. यावेळी हे डबे अनियंत्रित होऊन रुळाखाली घसरू शकले असते. मात्र, सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकारामुळे प्रवाशात एकच खळबळ उडाली होती. इंजिन ५ किलोमीटर पुढे निघून गेल्यावर चालकाला हा प्रकार लक्षात आला. रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सुटलेल्या २२ डब्यांना दुसरे इंजिन जोडून गाडी वरोरा स्थानकावर आणली. त्यानंतर पुढे गेलेले इंजिन परत आणून तब्बल 3 तासांनी गाडी बंगळुरूच्या दिशेने रवाना झाली. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.