चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुसंख्य शेतकरी धान उत्पन्न घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. या शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचावा यासाठी सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राने एक उपकरण तयार केले. 'डायरेक्ट पॅडीसीडर' असे या उपकरणाचे नाव असून या माध्यमातून भात उत्पादक शेतकऱ्यांचा एकरी साडेसहा हजार रुपये एवढा खर्च वाचणार आहे. सध्या याचा प्रायोगिक तत्वावर उपयोग होत असून यात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले तर हा प्रयोग कृषी क्रांती करणारा ठरणार आहे.
सिंदेवाही कृषी संशोधन केंद्रात कृषीविषयक वेगवेगळे प्रयोग आणि संशोधन केले जाते. याच प्रयोगातून 'डायरेक्ट पॅडीसीडर' हे अभिनव उपकरण तयार झाले. ज्याचा उपयोग धानपेरणीसाठी होणार आहे. एखाद्या छोट्या बैलगाडीएवढे हे उपकरण एक व्यक्ती सहज चालवू शकतो. एक दिवसात एक हेक्टर म्हणजे अडीच एकर जमिनीवर याची सहज पेरणी करता येते. त्यामुळे हे करण्यासाठी शेतमजुरांची गरज भासणार नाही.
सध्या या प्रयोगाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जात आहे. खात्री पटल्यावर काही शेतकरी आपल्या शेतीत हा प्रयोग करीत आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथील धानउत्पादक शेतकरी आनंदराव बावणे यांनी आपल्या अर्धा एकर शेतीत हा प्रयोग केला. त्यांच्याकडे घरचे बियाणे असल्याने या पेरणीसाठी केवळ दोनशे रुपये खर्च आला. पूर्वी आनंदराव बावणे यांना याच कामासाठी जवळपास पाच हजार एवढा खर्च येत होता. हे चित्र अत्यंत आशादायक आहे. मात्र, हा प्रयोग किती यशस्वी ठरला याचे मूल्यांकन भाताचे उत्पादन झाल्यावर ठरणार आहे.
- डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटिका तयार करण्याची गरज नाही.
- थेट बीजे या उपकरणातून पेरता येतात.
- उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे सुध्दा व्यवस्थापन करता येते.
- ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करता येते.
- रोवणी करीता रोपे तयार करणे, रोपे काढणे, मुख्य शेतात पसरविणे व रोवणी करणे इत्यादी कामावरील प्रति एकर पाच हजार रुपये एवढ्या खर्चाची बचत होते.
- पेरणी केलेले पीक 7 ते 10 दिवस लवकर परिपक्व होते.
- डायरेक्ट पॅडीसिडर वजनाने हलके असल्यामुळे हाताळणी करण्यास सोपे असते
बावणे यांच्या शेतातीतल भात पेरणीच्या या उपयुक्त अशा प्रयोगावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी शहाजी शिंदे, पंचायत समिती सभापती अलका आत्राम, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप बारामते, प्रशिक्षणार्थी गुणवंत माेरे, मुन्ना लाेणारे, प्रशांत कावटकर, प्रगतशील शेतकरी सुनील निमसरकार हे उपस्थित होते.