चंद्रपूर: जिल्ह्यात काही मोजक्याच ठिकाणी टोफू मिळते. अनेक जणांना तो हवा असतो मात्र तो कुठे मिळतो हेच लोकांना माहिती नाही. ही स्थिती लक्षात घेता एका ध्येयवेड्या महिला प्राध्यापिकेने धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांनी थेट टोफू तयार करण्याचे स्टार्टअपच घरी उभा केला आहे. विजयालक्ष्मी पारीक असे या महिला प्राध्यापिकेचे नाव आहे. त्यामुळे आता चंद्रपुरात आता सहजरित्या टोफू उपलब्ध होऊ शकणार आहे.
अशी सुचली कल्पना: विजयालक्ष्मी पारीक ह्या सरदार पटेल महाविद्यालयात बीसीएच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांच्या मनात सातत्याने काहीतरी वेगळं करण्याची कल्पना येत होती. अशातच इंटरनेटवरून त्यांना टोफू बद्दल माहिती मिळाली. हा पदार्थ अत्यंत पौष्टिक असून लोकांच्या आरोग्यासाठी अमृतासारखा काम करतो. जिल्ह्यात कुठेही टोफु तयार केला जात नाही. त्यामुळे टोफू तयार करण्याचा ठाम निर्धार विजयालक्ष्मी यांनी केला.
समोर आलेली आव्हाने: टोफू (सोया पनीर) हा सोयाबीनने बनलेला असल्याने अनेकदा तो खाल्ल्याने मळमळ होऊ शकते. त्यामुळे त्याची चव ही योग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशभरातील अनेक प्रकल्पात जाऊन विजयालक्ष्मी यांनी भेट दिली. त्याची चव घेऊन बघितली. मात्र त्यांना ती आवडली नाही. शेवटी दिल्लीतील प्रकल्पात तयार होणारा टोफू त्यांना योग्य वाटला आणि त्या यंत्राला त्यांनी चंद्रपूरला मागवून घेतले. मात्र तरीही टोफू तयार करणे सोप्पे नाही. याची बरीच किचकट आणि मेहनतीची प्रक्रिया आहे.
असा बनतो टोफु: आधी दोन दिवस सोयाबीनच्या दाण्यांना भिजू घालावे लागते. यानंतर त्याचे दाण्याच्या वरचे आवरण सोलून काढावे लागते. यानंतर त्याला भरडले जाते. त्यात सोयाबीनचा रस एका बाजूला तर चोथा दुसऱ्या बाजूने निघतो. चोथ्यात पाणी घालुन पुन्हा तो चक्कीत टाकावा लागते. यानंतर शंभर डिग्रीच्यावर वाफेच्या साहाय्याने या रसाला उकळावे लागते. यानंतर या रसाचे विघटन केले जाते. ज्यातून हे टोफु तयार केले जाते. त्यातून सोयामिल देखील तयार केले जाते.
कसा मिळतो आहे प्रतिसाद: विजयालक्ष्मी ह्या प्राध्यापिका असल्याने त्यांनी याबाबत सर्वात आधी आपले विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी स्वतः टोफूची ऑर्डर दिली. त्यांना याची चवही आवडली शिवाय त्याची किंमतही खिशाला परवडणारी होती. इथून विजयालक्ष्मी यांचा हा प्रवास सुरू झाला. मागणीनुसार विजयालक्ष्मी महाविद्यालयात टोफू आणून ठेवतात. शिवाय त्यांनी शहरातील विविध जिममध्ये जाऊन या टोफुचे फलक लावले आहेत, त्यानुसार जे ऑर्डर येतात त्याची पूर्तता त्या करतात. मात्र अनेकांना याबाबत माहिती नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही. मात्र याबाबत विजयालक्ष्मी पारीक आशावादी आहेत. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून या संदर्भात महिती देणार आहेत. आज नाही तर उद्या त्यांना याचे महत्त्व कळेल असे त्या सांगतात.
टोफू खाण्याचे फायदे: टोफुत चांगले फॅट असते. वजन कमी करण्यास मदत होते, हृदयासाठी देखील हे चांगले असते. प्रोटिन्स यात मोठ्या प्रमाणात असते. शिवाय कॅल्शियम, मॅगनीज, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, फॉस्फोरस, आयरन, मग्नशिअम, झिंक यात मोठया प्रमाणात असतात. त्यातही सध्या वेज लोकांची संख्या वाढत आहे. त्यात मांसाहार तसेच दुग्धजन्य पदार्थ वर्ज केले जातात. अशा लोकांसाठी टोफू हा उत्तम पर्याय असू शकतो.