चंद्रपूर - शहरातील रहेमतनगर येथील रफीक मेनन यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रहेमतनगरकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
रहेमतनगरातील व्यावसायिक रफीक मेनन यांचे काही दिवसांपूर्वीच नागपुरात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र, वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. डॉ. नगराळे यांच्या रुग्णालयात रफीक मेनन यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप होता. त्यानंतर त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते. मात्र, तेथे त्यांचे निधन झाले. यानंतर डॉ. नगराळे यांचे रुग्णालय सील केले होते. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रहेमतनगर परिसरात सील केले. या भागात येणारे सर्व रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले आहेत. सध्या या परिसरात पोलीस बंदोबस्त आहे. मनपाच्या माध्यमातून या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.