चंद्रपूर - जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद असल्याने दारू तस्करी ठप्प आहे. अशावेळी तळीरामांनी मोहाच्या दारूकडे आपला मोर्चा वळविला आहे. सध्या या दारूला प्रचंड मागणी असून अनेकांनी यात हात अजमवायला सुरुवात केली आहे. मात्र, यावर पोलिसांची करडी नजर असून अनेक ठिकाणी यावर कारवाई करण्यात येत आहे. आज शहरातील लालपेठ परिसरात बंद असलेल्या वाळूच्या बंकरमध्ये मोहफुलाच्या दारूची निर्मिती सुरू होती. शहर पोलिसांनी यावर कारवाई करीत दोघांना अटक केली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मोठी गैरसोय होताना दिसतेय. मात्र, संचारबंदीचा फायदा उचलत काहींनी मोहफुलाची दारू काढून विकायला सुरुवात केली. चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या रेती बंकरजवळ मोहफुलाची दारू काढत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला. यात 20 लीटर मोहाची दारू, 100 किलो सडवा, एका दुचाकीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी जवळपास 1 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सुशील कोडापे, स्वामी चालेकर, महेंद्र बेसरकर, सतीश टोंगलकर यांनी केली आहे.