चंद्रपूर - केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी योजना हंगाम 2020-21अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना केंद्रावर नोंदणी करण्यासाठी चालू वर्षाचा सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँकेच्या पासबूकची झेरॉक्स या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.
मूल तालुक्यात मूल व राजोली, सिंदेवाही तालुक्यात सिंदेवाही, नवरगाव व रत्नापूर, सावली तालुक्यात सावली, व्याहाळ व पाथरी, नागभीड तालुक्यात नागभीड, तळोधी व कोर्धा, चिमूर तालुक्यात चिमूर व नेरी, ब्रह्मपुरी तालुक्यात ब्रह्मपुरी, बरडकिनी, अव्हेर-नवरगाव, पिंपळगाव, चौगान व आवळगाव, पोंभुर्णा तालुक्यत बोर्डा दीक्षित तर बल्लारपूर तालुक्यात कोठारी याठिकाणी खरेदी केंद्र असणार आहेत.
'असा' ठरणार धानाचा दर
अ प्रत धानाचा दर एक हजार 888 रुपये प्रति क्विंटल तर साधारण धानाचा दर एक हजार 868 रुपये प्रति क्विंटल असा असणार आहे. शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर नेताना ते स्वच्छ करून न्यावे, त्याचा ओलावा (आद्रतेचे प्रमाण) 17 टक्क्यांपेक्षा कमी असावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, गर्दी करू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.