चंद्रपूर - राज्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. याचे कारण लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यातील एकमेव काँग्रेसचे खासदार हे चंद्रपूरमधून निवडून गेल्याने मुनगंटीवार यांना ही निवडणूक सोपी नसणार आहे.
बल्लारपूर मतदारसंघ
पूर्णतः ग्रामीण तोंडवळ्याच्या या मतदारसंघात बल्लारपूर पेपर मिल असलेले बल्लारपूर शहर, हे एकमेव शहरी केंद्र आहे. राज्याचे अर्थ-नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.
आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाते. मात्र 2014 ला काँग्रेसने जागाबद्दल करत ही जागा आपल्याकडे घेतली मात्र तुल्यबळ उमेदवार नसल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा सहज विजय झाला. गेल्या ५ वर्षात अर्थखाते स्वतःकडे असलेल्या मुनगंटीवार यांनी रस्ते-सिंचन-शेती आणि विकासकामांबाबत सुक्ष्म नियोजन केले आणि मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे खेचून आणल्याचे येथील जनतेचे म्हणने आहे. याच जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास मुनगंटीवार यांना आहे.
हेही वाचा... पवार साहेब! तुम्ही एकटे तरी किती लढणार...?
सलग 2 वेळा बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार सध्या विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी रिंगणात असतील, मात्र भाजपचे माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांचा लोकसभेत धक्कादायक पराभव झाला होता. या एकमेव मतदार संघात भाजपचे मताधिक्य घटले आणि काँग्रसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर येथून निवडून आले. यामुळे लोकसभेचा पराभव हा मुनगंटीवार यांच्या पुढे अडचणी वाढवणारा आहे.
वंचित फॅक्टर बल्लारपूरमध्ये सर्वात प्रभावशाली
वंचितच्या उमेदवारामुळे मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता आहे. लोकसभेत राज्यात वंचितच्या उमेदवाराला सर्वाधिक मते याच मतदारसंघात मिळाली होती. यामुळे वंचित फॅक्टर या मतदारसंघात चालल्यास मुनगंटीवार यांना ही निवडणूक जड जाऊ शकते.
हेही वाचा... जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?
याचबरोबर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राजू झोडे यांचे मुनगंटीवार यांना कडवे आव्हान असण्याची शक्यता आहे. मागील 5 वर्षात त्यांनी हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. शासन प्रशासन यांच्या विरोधात मागील 5 वर्षात काढलेल्या मोर्चांमुळे झोडे यांना जनतेचा मोठा पाठिंबा आहे.
दारू समस्या ही या मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या आहे. तसेच भाजपाच्या अंतर्गत पक्षीय गटबाजीचा फटका मुनगंटीवार यांना बसू शकतो. यामुळे बल्लारपूर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार हे नक्की.
हेही वाचा... साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? उदयनराजेंना तगडं आव्हान