चंद्रपूर- कर्तव्यावर असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली येऊन वेकोली येथील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शहरातील महाकाली कोळसा खाणीत घडली. कर्मचाऱ्याचे नाव माधव कोपुलवार असून या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माधव कोपुलवार (वय.५३) हे नेहमीप्रमाणे आज सकाळी कामावर गेले होते. कर्तव्यावर असताना अचानक वाळूचा ढिगारा कोसळला आणि त्यात ते दबले गेले. घटनेची माहिती वेकोली कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कोपुलवार याना वाळूच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र, या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
हा अपघात होता की चूक, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, यादरम्यान वेकोली कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर हा संताप निवळला गेला. यापूर्वीसुद्धा येथे घडलेल्या घटनेत अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
हेही वाचा- चंद्रपुरात उद्देशिका वाचून संविधान दिन साजरा