चंद्रपूर - कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडीजवळ झाला. दरम्यान, जखमींपैकी ४ जण गंभीर असल्याचे समजते.
गोसेखुर्द मुख्य कालव्याच्या प्रकल्पाचे काम सुरू असून याचे कंत्राट एका खासगी कंपनीला मिळाले आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय भुजजवळ असून या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग कामावर आहे. त्यातील काही कर्मचारी एका चारचाकी वाहनाने स्वतःच्या गावी जात होते. वाहन गांगलवाडी जवळ आले असताना वाहन चालकाच्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली.
यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दहा जण जखमी आहेत. जखमींपैकी गंभीर असलेल्या ४ जणांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तर अन्य ५ जणांना आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आणि एकावर ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.