चंद्रपूर - जंगलालगत असलेल्या वांझोट्या जमिनीवर काबाडकष्ट करुन मशागत केली. जमिनीत घाम गाळून तिला पिकवण्यायोग्य करण्यासाठी त्यांच्या पिढ्यांन पिढ्या झिजल्या. मात्र, अजूनही या काळ्या आईच्या लेकरांना उपऱ्यासारखेच जीवन जगावे लागत आहे. ही व्यथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनिल लटारी गोयलसारख्या अनेक शेतकऱ्यांची...ज्यांनी या जमिनीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले... त्याच व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय 'ईटीव्ही भारत'ने बळीराजा सोबत एक दिवस.. या उपक्रमातून..
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील बेघर वस्तीला लागूनच जंगल आहे. जे धाबा वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येते. येथील झुडपी आणि दलदलीच्या जमिनीला लटारी गोयल यांनी काबाड कष्ट करून शेती योग्य केली. त्यावर धानाचे पीक घ्यायला सुरुवातही केली. मात्र, त्यांच्यासाठी जमीन कसणे म्हणजे 'ईकडे आड, तिकडे विहीर' अशीच होती. एकीकडे वनविभागाचे कर्मचारीही जमीन वनविभागाची असल्याचे सांगत पीक घेण्यास मज्जाव करायचे, तर दुसरीकडे वन्यजीव पीक फस्त करायचे... या संघर्षातच लटारी गोयल यांची हयात गेली आणि 2004 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुटुंबातील १३ सदस्यांच्या करावी लागते तरदूत -
आता शेती करण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा अनिल गोयल याच्या खांद्यावर येऊन पडली. मात्र, हा संघर्ष किंचीत कमी झाला नाही. उलट दिवसेंदिवस ही स्थिती आणखी बिकट झाली. अनिल त्याची पत्नी आणि त्यांची चार मुले, अनिलच्या मृत पावलेल्या बहिणीची पाच मुले, जावई आणि आई अशा 13 जणांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना कमालीचे कष्ट करावे लागत आहे. शेतीमधून जितके उत्पादन होते त्यातील निम्म्यापेक्षा धान हे कुटुंबासाठीच लागते. उरलेले विकून इतर धान्य आणि वस्तू घ्याव्या लागतात.
अंग झाकण्यापुरते चांगले कपडे आणि इतर गृहोपयोगी बाबी तर दूरच राहिल्या. हेही त्याच वेळी शक्य होते, ज्यावेळी चांगले उत्पादन होते. अन्यथा या कुटुंबाला रोजंदारीसाठी वनवन फिरावे लागते. पदरी मिळेल त्यातूनच कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो. अशा या कठीण संकटांचा सामना शेतकऱ्यांना करत उपऱ्याचे जीवन जगावे लागत आहे.