राजुरा (चंद्रपूर) - तालुक्यातील कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे स्वतंत्र कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. 50 खाट असलेल्या या कोविड केंद्राचा रुग्णांना लाभ होणार आहे.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. कोविड उपचारासाठी प्रत्येक रुग्णांना चंद्रपूरला पाठवले जाते. त्यामुळे राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार सुभाष धोटे यांनी स्वतंत्र कोविड काळजी केंद्र राजुरा येथे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून आज उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आजपासून ५० खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजन पल्स रेट 90 पर्यंत खाली आलेल्या रुग्णांवर या केंद्रामध्ये उपचार केले जाणार आहेत.
हेही वाचा - ब्रम्हपुरीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहू कुडमेथे, डॉक्टर बांबोळे, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर अमित चिद्धमवार, डॉक्टर डाखोळे, डॉक्टर अनिता आरके, डॉक्टर शेख, डॉक्टर स्नेहल डाहुले, या केंद्राचे प्रमुख डॉक्टर विवेक लांजेकर आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.