चंद्रपूर - देशात महिलांच्या सुरक्षेबाबत एकूणच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेसाठी आणखी कडक कायदे, तसेच विशेष न्यायव्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक असल्याची मागणी मर्दानी महिला मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंगणघाट येथे एका महिला शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याचा प्रकार झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यानंतरही असे अनेक प्रकार समोर आले. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
हेही वाचा... अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर
अगदी लहान वयापासून मुलींवर अत्याचार होऊ लागले आहे. मात्र, तरीही आरोपींवर पाहिजे तशी कारवाई किंवा त्यांना शिक्षा होताना दिसत नाही. त्यातही प्रक्रियेत अनेक वर्षांचा काळ लोटतो. जोवर यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात नाही, तोवर देशाची ही स्थिती सुधारणार नाही. महिलांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी. महिला अत्याचार प्रकरणात प्रत्येक न्यायालयाला निकाल देण्याची कालमर्यादा असावी, अशी मागणी मर्दानी महिला मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू नये. आरोपींना तात्काळ कडक शिक्षा द्यावी. यामुळे समाजात एक जागृती निर्माण होवून अशा घटना कमी होण्यास मदत होईल, असे मर्दानी महिला मंचच्या अध्यक्षा शोभाताई फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबतची माहिती मर्दानी महिला मंचच्या वतीने आयोजीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माजी आमदार शोभाताई फडणवीस, माजी महापौर अंजली घोटेकर, शोभा पोटदुखे आदींची उपस्थिती होती.