चंद्रपूर - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. हे काही अर्थी जरी सत्य असले तरी आपले व्यक्तीमत्त्व हे आपल्या परिश्रमाने, कर्तव्यानिष्ठेने, स्वतःवर असलेल्या विश्वासाने, पुढे येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या क्षमतेने घडत असते. याचे आदर्श उदाहरण म्हणून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे बघितले जात आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील भांदकसारख्या एका छोट्याशा गावातील एक शिस्तप्रिय निरागस मुलगा ते मुंबईचे पोलीस आयुक्त हा त्यांचा प्रवास कुणालाही थक्क करणारा आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहेच, मात्र आज त्यांच्यामुळे जिल्ह्यातील असंख्य युवकांना आपणही पुढे जाऊन असे काही करू शकू ही प्रेरणा मिळाली हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे. हेमंत नगराळे यांचे बालपण याच भद्रावती (पूर्वी भांदक)च्या गल्लीत गेले. सहावीपर्यंत शिक्षण त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांच्या बालसवंगड्यांनी..
परिश्रम, महत्त्वाकांक्षा, चिकाटी आणि प्रामाणिकता
आज भद्रावती हे शहर हे नगर परिषद म्हणून ओळखले जाते. मात्र, 70च्या दशकात हे एक खेडे होते ज्याला भांदक म्हणून ओळख होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे हे मूळ गाव. आजोबा डॉक्टर तर वडील इंजिनिअर म्हणून सरकारी खात्यात होते. त्यामुळे निश्चितच घरी शैक्षणिक वातावरण होते. सभ्य आणि सुसंकृत घराणे म्हणूनच नगराळे घराण्याची ओळख पंचक्रोशीत होती. हेमंतदेखील त्याच मुशीत घडलेले. त्यामुळे शाळेतही त्यांची ओळख एक सभ्य, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक विद्यार्थी अशीच होती. पहिली ते चौथी शिक्षण त्यांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. यावेळी त्यांच्या सोबत राजू गुंडावार, जावेद शेख, शेख अकिल, दिलीप चटपल्लीवार, पुरुषोत्तम उमरे, प्रकाश माकोडे हे त्यांच्या सोबतीला होते. हे सर्व सांगतात हेमंत हे अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचे होते. त्यांनी एखादयाच्या खोड्या केल्या, टिंगलटवाळी केली हे कधीही आठवत नाही. त्यावेळचे शिक्षक भयंकर शिस्तप्रिय आणि मारकुंडे होते. कुठलाही कसूर केल्यास विद्यार्थ्यांना थेट बदडून काढले जाई. त्यावेळी असलेल्या शिक्षिका क्षीरसागर मॅडम, मुख्याध्यापक कन्नमवार यांचाही असाच दरारा होता. मात्र हेमंत यांना शिक्षा तर दूर कधी शिक्षकांनी ओरडलेसुद्धा नाही. कारण एका आदर्श विद्यार्थ्यांत जे गुण असतात ते सर्व नगराळे यांच्यात होते. म्हणूनच ते वर्गाचे कॅप्टन होते. मात्र हा सभ्य आणि संयमी मुलगा पुढे जाऊन आपल्या गावाचं आणि जिल्ह्याचं नाव काढेल की सर्वांची छाती अभिमानाने भरून येईल असे कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र, हेमंत नगराळे यांचे परिश्रम, महत्त्वाकांक्षा, चिकाटी आणि प्रामाणिकता यामुळेच हे शक्य झाले आहे.
भद्रावतीभूषण पुरस्काराने सन्मानित
2019 ला हेमंत नगराळे पोलीस महासंचालक असताना चंद्रपुरात आले होते. येथे फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन होते. यादरम्यान त्यांनी आपले मूळ गाव भद्रावतीला आवर्जून भेट दिली. यावेळी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सर्वांच्या वतीने नगराळे यांना भद्रावतीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांनी नम्रतेने स्वीकारला.
...आणि गुंडावार यांचा फोन खणखणला
डिसेंबर 2019ला फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन चंद्रपुरात होणार होते. नागपूरहून चंद्रपूरला जाताना मध्ये भद्रावतीदेखील पडते. हे त्यावेळी पोलीस महासंचालक नगराळे यांना ठाऊक होते. त्यांनी आपले बालमित्र असलेले राजू गुंडावार यांचा मोबाइल नंबर मिळवला आणि थेट कॉल केला. समोरून हेमंत नगराळे बोलताहेत हे ऐकून गुंडावार यांनादेखील सुखद धक्का बसला. कारण जरी ओळख असली तरी सर्व आपल्याला आयुष्यात व्यस्त झाले होते. त्यात नगराळे हे किती व्यस्त असतील याचीही कल्पना सर्वांना होती. मात्र, नगराळे यांनी स्वतः फोन करून आपल्या सर्व वर्गमित्र, सवंगाड्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
पाच मिनिटांची भेट तब्बल दोन तास चालली
नगराळे यांनी आपल्या व्यस्ततेमुळे जुन्या मित्रांना भेटण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र, जुन्या मित्रांना भेटताच ते आपल्या बालपणात हरवून गेले. सर्वांशी गप्पा मारताना दोन तासांचा वेळ कधी गेला हे कुणालाही कळले नाही.
शाळेला दिली भेट
आपल्या प्राथमिक शाळेला नगराळे यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जंगी स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. यावेळी नगराळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शनदेखील केले.
आपल्या माणसांसाठी सुरक्षा नाकारली
पोलीस महासंचालक म्हणून नगराळे यांची कडेकोट सुरक्षा होती. नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांची सुरक्षा पथके त्यांच्या सोबत राहणार होती. मात्र, त्यांनी ही सुरक्षा नाकारली. आपण आपल्या गावात, आपल्या माणसांत जात आहोत त्यामुळे सुरक्षेच्या बेड्या तोडून ते सर्वांना भेटले. आपुलकीने सर्वांशी संवाद साधला.