चंद्रपूर - जो काम करणार नाही त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणे ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जे काम करणार नाही अशांची एक यादी करून त्यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करावी. त्यामुळे चंद्रपूर येथून महेश मेंढे यांच्या उमेदवारीवर नाराज कार्यकर्त्यांना चांगलाच दणका बसला आहे.
चंद्रपूर येथून काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार यावर चांगलेच राजकीय नाट्य घडले. यासाठी किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशही घेतला. मात्र, ऐनवेळी ही उमेदवारी महेश मेंढे याना देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे काही पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळेच आजच्या (बुधवार) काँग्रेसच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. यामध्ये काँग्रेस चंद्रपूर महानगर अध्यक्ष नंदू नागरकर यांचाही समावेश होता.
हेही वाचा - हाताच्या सोबतीला "घड्याळ" दिसेना, राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड?
या बैठकीसाठी खासदार बाळू धानोरकर हे देखील आले होते. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. आपल्या भाषणात त्यांनी दांडी मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जे पदाधिकारी अनुपस्थित राहतील किंवा सहकार्य करणार नाहीत. त्यांना रीतसर पत्र देऊन त्यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करावी. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कुठलाही पदाधिकारी नाराज राहू नये यासाठी आपण जातीने लक्ष देऊ, असेही ते म्हणाले. पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी धानोरकर यांनी पाऊल उचलले आहे. यात त्यांना किती यश येते ही निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - हिराईनगरवासी निर्णयावर ठाम; निवडणुकीवर टाकणार बहिष्कार