चंद्रपूर - संपत्तीसाठी छळ करणाऱ्या मुलाला सुपारी देऊन आईवडिल व बहिणीने संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई, वडील व बहिणीला अटक केली आहे.
17 जुलैच्या सकाळी मौजा खेड या गावातील परिसरात एक व्यक्ती मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा मृतदेह चंद्रभान मडुजी झरकर या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. एकूण परिस्थिती पाहता हा खून असल्याचे ठाणेदार खाडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक तथ्य समोर आले. मुलगा दारू पिऊन कुटुंबातील सदस्यांना मारहाण करतो, त्रास देतो या कारणाने घरच्यांनीच त्याचा खून करण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. या प्रकरणात वडील मडु झरकर, आई सुमित्रा झरकर, बहीण शोभा गुंडे तसेच सुपारी घेणारा धनराज निखाडे याला अटक करण्यात आली आहे.
अशी घडली घटना
पोलीस तपासात मृत चंद्रभान हा आपल्या पत्नीसह उमरेडला राहत होता. तो पत्नीला मारहाण करत असल्याने त्याला सोडून पत्नी माहेरी हिंगणघाट गेली. चंद्रभान 14 जुलैला आई-वडील राहत असलेल्या नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथे आला. नेहमीप्रमाणे हिस्स्याची वाटणी करून द्या, असे म्हणत त्याने आईवडिलांना मारहाण केली. आईवडीलांच्या तक्रारीवरुन नागभीड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. 16 जुलैला चंद्रभान हा आपल्या मोठ्या बहिणीचा मुलगा प्रेमदास चौधरीया याला ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड गावात फिरताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ब्रम्हपुरी पोलिसांनी प्रेमदास चौधरीकडे चौकशी केली असता सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.
भावाने आई-वडिलाला मारहाण केल्याची माहिती मिळताच चंद्रभानची मोठी बहीण ही उमरेडहून आपल्यासोबत चार अनोळखी व्यक्तींना घेऊन आली होती. तेव्हापासून हे चार व्याक्ती चंद्रभानच्या मागावर होते. चंद्रभानला गाठून त्याला मारहाण करत, गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर खेड गावातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या रस्त्याला कडेला त्याचा मृतदेह टाकण्यात आला. नंतर हे चारही मारेकरी दोन दुचाकीने नवेगाव पांडव येथे गेले. आपण चंद्रभानला संपविले, असे सांगत त्यांनी ठरलेले 50 हजार घेत पोबारा केला.