चंद्रपूर - आजवरच्या महापौरांच्या कार्यकाळातील इतिहासात सर्वाधिक विकासकामे माझ्या कार्यकाळात झाली. त्यामुळेच शहराचा चेहरामोहरा बदलला. ही गोष्ट अनेकांना खुपत आहे. त्यामुळे विरोधक माझ्यावर ताशेरे ओढण्यासाठी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा आरोप केला जात असल्याचा दावा चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. अडीच वर्षे महापौर म्हणून अंजली घोटेकर यांनी कार्यकाळ सांभाळला. त्यानंतर ही संधी राखी कंचर्लावार यांच्याकडे आली. महापौर म्हणून कंचर्लावार यांचा आजवरचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांसाठी डब्बे वाटप, रुग्णांना भोजन वितरण, कचरा संकलन कंत्राट, खासगी कंपनीला प्रसिद्धीचे कंत्राट अशा अनेक मुद्द्यांवर घोटाळ्यांचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले होते. हे सर्व आरोप महापौर कंचर्लावार यांनी खोडून काढले.
हेही वाचा-अभ्यास कर म्हटल्याने मुलीकडून आईची हत्या तर नाशिकमध्ये चिमुकल्याची हत्या करून आईची आत्महत्या
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, की विरोधक हे नेहमीच आरोप करतात. मात्र, यात कुठलेही तथ्य नाही. जेव्हा एखादा व्यक्ती चांगले काम करत करतो, त्यावेळी त्याचा विरोध होतो. अनेक विकासकामे माझ्या कार्यकाळात झाली. संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करणारी 'अमृत' सारखी योजना माझ्याच कार्यकाळात पूर्णत्वास आली आहे. कोरोनाच्या काळात प्रसिद्धी कंपनीच्या माध्यमातून मोठी जागृती झाली. कोरोनाच्या काळात प्रशस्त असे रुग्णालय तयार झाले. अशी अनेक महत्वाची कामे झाल्याचे स्पष्टीकरण महापौर कंचर्लावार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
हेही वाचा-अनलॉक: कोरोना निर्बंध शिथिल, हॉटेल्स, रेस्टॉरंट १० पर्यंत राहणार सुरू
महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर झालेले आरोप-
- कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्णतः संचारबंदी असताना निराधार आणि गरीब लोकांना मनपाच्या निधीतून डब्बेवाटप करण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम मनपाचा असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचे लेबल लावून हे डबे वितरित करीत असल्याची बाब मनपाचे गटनेते पप्पू देशमुख यांनी समोर आणली.
- कोरोनाच्या काळात नागरिकांना वाटण्यासाठी एक लाख मास्कची ऑर्डर देण्यात आली. 'युज अँड थ्रो' असलेल्या मास्कची किंमत जवळपास 5 रुपये असताना प्रति मास्क दहा रुपये याप्रमाणे हे मास्क खरेदी करण्यात आले.
- कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोन्टीन सेंटरमधील व्यक्तींना भोजन पुरविण्याचे कंत्राट महानगरपालिकेने एका कंत्राटदाराला देण्यात आले. कुठलीही वस्तू त्याच्या एमआरपीपेक्षा (अधिकतर मूल्य) जास्त विकता येत नाही. मात्र येथे पाण्याची बॉटल, बिस्किटाच्या पाकिटाच्या किमतीपेक्षाही जास्त किंमत लावण्यात आली. त्यातही ह्या कंत्राटदाराने अर्ध्या किमतीत एका दुसऱ्या कंत्राटदाराला पेटी कंत्राट देऊन हे काम करून घेतले. त्यामध्ये भरपूर नफा मिळवल्याचा दावा करण्यात आला.
- शहरातील कचरा संकलनाच्या कंत्राटासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, सर्व निविदा ह्या कमी दरात असल्याने निविदा रद्द करण्यात येऊन पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. स्वयंभू कंपनीने पहिल्या वेळी कमी दरात निविदा भरली होती. मात्र दुसऱ्या वेळी ह्याच कंपनीला ज्यादा दरात हे कंत्राट देण्यात आले.
- महानगरपालिकेत पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी असताना प्रसिद्धीसाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनपाच्या तिजोरीत खळखळाट असताना प्रसिद्धीसाठी वर्षाला 24 लाख खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा मनपाकडे व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करण्यास पैसे नव्हते. त्याच वेळी महापौर यांच्यासाठी नवी कार खरेदी करण्यात आली. त्यातही व्हीआयपी नंबर या कारला मिळावा यासाठी आरटीओला अधिकचे 70 हजार रुपये मोजण्यात आले.
- 29 जुलैला मनपाच्या आमसभेत मोठा गदारोळ झाला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर यांच्यासमोरच्या टेबलवर जोरदार थाप मारली. यात भर टाकत चिडलेल्या महापौर यांनी नागरकर यांना थेट नेमप्लेट फेकून मारली. यानंतर नागरकर आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्यात धक्काबुक्की झाली.
- ही आमसभा आटोपल्यावर महापौर यांच्या कॅबिनमध्ये मिटिंग झाली. यावेळी महापौर यांचे नगरसेवक पती संजय कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ यांना अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तशी तक्रार उपायुक्त यांनी पोलिसांत केली आणि गुन्हा नोंदविण्यात आला.
हेही वाचा-उद्योग क्षेत्रात गुंडगिरी सहन केली जाणार नाही, सरकार उद्योगांच्या पाठिशी - उद्योगमंत्री
दरम्यान, या सर्व बाबीत महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.