चंद्रपूर - संविधानविरोधी सरकार देश चालवित आहे. भाजपचे विचार, तत्त्वज्ञान हे देशहितविरोधी असून, संविधान संपविण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. परंतु, बाबासाहेबांनी दिलेले संविधानच देशाला वाचवू शकते. संविधान आणि देश वाचविण्यासाठी भाजपा सरकारला हद्दपार करणे गरजेचे झाले असून, नागरिकांनी भाजपाला देशातून हद्दपार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी चंद्रपुरात केले. ( Balasaheb Thorat Criticize Bjp Chandrapur ) येथील शंकुतला फार्म येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यापूर्वी खासदार बाळू धानोरकर यांच्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील, आकाशवाणी रोडवरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुन्नाजी ओझा, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी आमदार देवराव भांडेकर उपस्थित होते.
काँग्रेसला यशापासून कोणीच रोखू शकत नाही -
कार्यकर्ता मेळाव्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र आहे. ही ताकद अशीच पुढे वाढवत नेण्याची जबाबदारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. माणसामाणसात भेद निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या पक्षापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. पुढील निवडणुकांमध्ये भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतल्यास आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला यशापासून कोणीच रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. मागील दोन वर्षांत कोरोना, अतिवृष्टी, गारपीट अशा संकटाचा सामना करीत सरकारने नागरिकांना धीर दिला आहे. शेतकरी, गरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम मविआ सरकारने या संकटकाळात केले आहे, असेही थोरात म्हणाले.
हेही वाचा - Raj Thackeray's in Pune : आम्ही देखील साहित्य प्रेमी पण.... पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
खासदार बाळू धानोरकरांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -
2019च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातुन काँग्रेसचे बाळू धानोरकर निवडून आले. ते निवडून आल्याच्या अडीच वर्षानंतर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन आज राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन झाल्याने जनसामान्यांना त्यांच्या तक्रारी आणि समस्या घेऊन जाणे आता सुकर होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर हे मूळचे वरोऱ्याचे आहेत. ते यापूर्वी भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार होते.