चंद्रपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व शासकीय कार्यालये व कामकाज ठप्प पडलेले आहे. याचा फायदा सागवान तस्करांनी घेत करोडोच्या सागवान वृक्षांची अवैध तोड करूण शेतात साठवणुक केली असल्याची गोपणीय माहीती वन विकास महामंडळाच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रा अंतर्गत भीसी उपक्षेत्रा मधील भिसी ते जामगाव रोड लगतच्या शिवारात रात्री १० च्या सुमारास तपासणी केली. यावेळी करोडो रुपयाचा अवैध सागवान आढळला. याची माहीती वन विभागाला देताच त्यांनी हा साठा जप्त केला.
देशात व राज्यात संचारबंदी असतानाही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावत आहेत. रविवारी रात्री या विशेष पथकाला तालुक्यातील भिसी चिमूर महामार्गाच्या बाजुला जामगाव रोडवरील शिवारात अवैध तोड केलेले सागवानाची मोठया प्रमाणात साठवणुक केल्याची गोपनीय माहीती मिळाली. माहीतीच्या आधारे वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाचे प्रमूख तथा वन परीमंडळ अधिकारी रमेश बलैया, भीसीचे वन क्षेत्र सहाय्यक आशिष बायस्कर, वनरक्षक आर .पी आगोसे सह शेत शिवाराची तपासणी केली. यावेळी जवळपास 12 ट्रॅक्टर साग इमारत व साग बीटांची अवैधरित्या तोड करून साठवण केल्याचे निदर्शणात आले. स्थळावर कुणीही नसल्याने सदर साठा पथकाने जप्त केला.
घटनास्थळ हे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्याने चिमूर वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्याप्रमाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठुन अवैध सागवान साठा ताब्यात घेतला. पुढील चौकशी चिमूर वन परीक्षेत्र अधिकारी भावीक चिंवडे करत आहेत.
![millions of Teak wood have been storedIn the lockdown time](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhdhc01chimurvis_13042020165602_1304f_1586777162_575.jpg)
संचारबंदीत शासनाने वनाधिकाऱ्यांना वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षणाची कामे अधिक प्रभावीरीत्या करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही याप्रकरणात वनविभागाचे अधिकारी कामात दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे. या प्रकरणात अवैधरीत्या साग झाडाची तोड करून त्याची साठवण करण्यामागे वन कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. वन विभागाच्या कार्यक्षेत्रात वन विकास महामंडळाच्या विशेष पथकाने केलेल्या कार्यवाहीने वन विभागाच्या जबाबदारीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे .
गोपनीय माहीतीच्या आधारे जिल्ह्यातील मोठा अवैध सागवान साठा मिळाला आहे. वृक्षांची अवैध तोड करून साठवणुक करण्याचे कृत्य हे एक दोन दिवसाचे नाही. घटनास्थळी कुणीही आरोपी मिळाला नसल्याने चौकशी अंती संबधितावर कठोर कार्यवाही होईल.
रमेश बलैया (वन विकास महामंडळाचे विशेष पथक प्रमूख)
प्राथमिक तपासावरून विविध ठिकाणावरूण अवैध सागवान वृक्षांची तोड करण्यात येऊन साठवण करून ठेवण्यात आले आहे. सविस्तर चौकशी करुन आरोपीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वन परीक्षेत्राचे अधिकारी रमेश बलैया यांनी दिली.