चंद्रपूर - नागरिकत्व संशोधन कायदा देशातील कुठल्याही समुदाय विशेषच्या विरोधात नाही. मात्र, याबाबत काँग्रेस देशात जाणीवपूर्वक भ्रम पसरवीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला. नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात जिल्हाभरात आंदोलन सुरू आहे. असे असतानाच या कायद्याच्या समर्थनार्थ शनिवारी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय चेतना मंचच्या नावाखाली निघालेल्या या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या.
मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना अहीर म्हणाले, 'एनआरसी' ला समर्थन म्हणजे देशप्रेमच आहे. मुस्लिमांना पाकिस्तान आणि काँग्रेसने शांततेने जगूच दिले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. स्थानिक गांधी चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी पूर्व पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस, माजी आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखी कंचलवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, नगरसंघचालक अॅड. रवींद्र भागवत आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - सीएए आंदोलनात हिंसा: अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील १ हजार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल