चंद्रपूर - वेगळा विदर्भ राज्य करण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य समितीच्या वतीने सोमवारी गोंडपिपरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही वेळ चंद्रपूर-अहेरी या प्रमुख मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. या मागणीसोबत अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
गोंडपिपरीसह जिल्हयातील अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. गोंडपिपरीच्या शिवाजी चौकात विदर्भ राज्य समितीचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. शिवाजी चौकापासून ते तहसिल कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसिल कार्यालयासमोर चंद्रपूर अहेरी मुख्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य समितीचे तालुकाध्यक्ष अरूण वासलवार यांनी केले.
हेही वाचा - मृत्यूनंतरही 'त्याने' दिले ५ जणांना जीवदान
यावेळी विदर्भ राज्य समिती आंदोलनाचे नेते अॅड.वामनराव चटप यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसह विद्युत बिल माफ करावे, सर्पदंशाने मृत झालेल्यांनाही मदत करण्यात यावी, अशा मागणी करण्यात आली. आंदोलनात अॅड. वामनराव चटप, अरूण वासलवार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.