चंद्रपूर - मैत्रेय कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून त्यातून आलेली रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. मात्र, अद्यापही गुंतवणूकदारांना हे पैसे परत मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 19 सप्टेंबरला आंदोलनकर्ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर आंदोलन पुकारणार आहेत.
मैत्रेय नामक कंपनीत 19 हजार एजंटच्या माध्यमातून जिल्ह्यातील 29 हजार लोकांनी तब्बल 260 कोटींची गुंतवणूक केली होती. 5 फेब्रुवारी 2016 ला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता संबंधित कंपनी बंद करण्यात आली. आपला पैसा परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदार एजंट्सकडे तगादा लावत आहेत. संबंधित प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मैत्रेय कंपनी व त्याच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांची संपत्तीचा लिलाव करून गुंतवणूकदारांच्या रक्कमेची परतफेड करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
हेही वाचा नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावे 16 कोटीचा भामट्याने घातला गंडा
यानंतर शासनाने त्यांच्या संपत्तीवर जप्ती आणली; मात्र, गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले नाहीत. यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूकदार तणावाखाली आहेत. त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा नाशकात कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात कोट्यवधींची फसवणूक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुंतवणूकदारांना पैसे लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही अद्याप पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदार आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. 19 सप्टेंबरला दुपारी 12 वाजत हे आंदोलन करण्यात येणार असून, पैसे परत न मिळाल्यास मुनगंटीवार यांच्या विरोधात प्रचार करण्याचा इशाराही गुंतवणूकदारांनी दिला आहे.