चंद्रपूर : 'जाती - धर्मात भांडणे लावणे, देशात अस्थिरता निर्माण करणे आणि त्यातून सहानुभूती मिळवून सत्ता काबिज करणे हे भारतीय जनता पक्षाचे काम आहे. दंगली पेटवूनच भाजपा सत्तेत आली आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे २०२४ मध्ये सत्तेतून बाहेर फेकल्या जाण्याची चिन्हे दिसताच केंद्रातील भाजपा सरकार राममंदिराच्या कारसेवकांना बोलावून तेथे गोध्रासारखी परिस्थिती निर्माण करू शकते', असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकार डिसेंबर महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका घेऊ शकते : 'शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना भविष्याची चिंता दिसत आहे. सव्वा वर्षांपासून ते मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून आहेत. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही', असा टोला वडेट्टीवारांनी यावेळी सरकारला लगावला. 'पुण्याचे उपमुख्यमंत्री सत्तेत सहभागी झाले. मात्र, त्यांच्यासोबत किती आमदार आहेत हे त्यांना सांगता येत नाही. केवळ त्यांच्याकडूनच मोदींचे गुणगाण सुरू आहे. मात्र देशातील आणि राज्यातील जनतेमध्ये भाजपा सरकारविरोधात चीड आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार डिसेंबर महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका घेऊ शकते', असा दावा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केला.
निवडणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप राहणार : 'काँग्रेसविषयी लोकांमध्ये सहानुभूती दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षसुद्धा जबाबदारीचे भान ठेवून काम करणार आहे. वनसंवर्धन कायदा, निवडणूक आयुक्ताच्या निवडीच्या समितीत मंत्र्यांना स्थान देणे, असे निर्णय घेतले जात आहेत. यातून जंगले नष्ट होणार आहेत. तसेच निवडणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप राहणार आहे', असे वडेट्टीवार म्हणाले.
पंतप्रधानांच्या आवाहनाला जनता प्रतिसाद देत नाहीये : कोरोना काळात पंतप्रधानांनी थाळी वाजविण्यास सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी थाळी वाजविली. आता 'मेरी माटी-मेरा देश' उपक्रमांतर्गत सेल्फी पाठविण्याचे आवाहन केलंय. मात्र, केवळ दोन टक्के लोकांनीच सेल्फी पाठवल्या आहेत. यातून पंतप्रधानांच्या आवाहनाला देशातील जनता प्रतिसाद देत नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा :