चंद्रपूर - जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यावर अखेर शासकीय शिक्कामोर्तब झाले. याबाबत शासन निर्णय पारित झाला असून दारूच्या दुकानांचे परवाने नुतनीकरण करण्यासंदर्भात यात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारूची दुकाने लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रामनाथ झा यांच्याकडून अहवाल सादर -
जिल्ह्यातील दारुबंदीची समीक्षा करण्यासाठी शासनस्तरावर 13 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. रामनाथ झा यांच्या नेतृत्वात ह्या समितीने अभ्यास करून तसा अहवाल शासनाला सुपूर्द केला होता. यात दारुबंदीमुळे गुन्हेगारी कशी वाढली, आरोग्यविषयक समस्या कशा वाढल्या याबाबत गंभीर अभिप्राय दिला. त्यामुळे चंद्रपुरातील दारुबंदी उठणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. रामनाथ झा ह्यांनी याबाबतचा अहवाल मंत्रिमंडळाला सुपूर्द केला.
हेही वाचा - बाळकडू चित्रपटाच्या महिला निर्मात्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक
दुकाने सुरू करण्यास परवानगी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दहा दिवस लोटूनही याचा शासन निर्णय निघाला नव्हता. अखेर ही प्रतीक्षा संपली असून आज मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 8 जून 2021 रोजी याबाबत परिपत्रक काढले. 1 एप्रिल 2015 च्या आधी ज्या दारू परवानाधारकांनी नूतनीकरण केले होते त्या सर्व दारू दुकानांना 'जैसे थे' स्थितीत दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या परवानाधारकांना चालू आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण शुल्क भरणे केले आवश्यक आहे. नवे दारू दुकान सुरू करताना राज्य शासनाने 'एक खिडकी योजना' सुरू केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गालगतच्या दुकानांना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आता अन्य जिल्ह्यातूनही दारू दुकाने स्थलांतरित होऊ शकणार आहेत.
हेही वाचा - मनोरूग्णांची सेवा करण्यासाठी कर्नाटकातील सिरिलने सोडली परदेशातील नोकरी