चंद्रपूर - सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या दोन जणांचा, झाडावरच वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय १६ जण किरकोळ जखमी आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूरच्या नगभीड तालुक्यातील तळोधी गावाजवळ घडली. अशोक कोंडूजी तिरमारे (वय. ४५) आणि लेकचन्द रामू पोहनकर (वय. ११) अशी मृतांची नावे आहेत.
जुलै महिना आला तरी जिल्ह्यात अजूनही तुरळक ठिकाणीच पाऊस पडत आहे. त्यातही हा पाऊस विजेच्या गडगडाटासह कोसळत आहे. यामुळे अनेक दुर्घटना देखील घडत आहेत. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील नवोदय विद्यालयाजवळ एका वडाच्या झाडाखाली जवळपास १५ ते २० लोकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घेतला होता. यावेळी मुसळधार पाऊसासह वीजाही कडाडत होत्या. यातील एक वीज ही थेट त्या झाडावरच कोसळली.
यात अशोक कोंडूजी तिरमारे आणि लेकचन्द रामू पोहनकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये लता दत्तुजी चिलबुले, रागीना संजय जिवतोडे या महिलांचा समावेश आहे. मृत अशोक कोंडूजी तिरमारे हे वलनी या गावचे रहिवासी होते. तर लेकचन्द रामू पोहनकर हा सोनूली गावातील रहिवासी होता. या घटनेत जखमी असलेल्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - ...शेवटी नुकसान शेतकरी आणि जंगलाचं; वनजमिनीच्या अतिक्रमणाचा संघर्ष शिगेला
हेही वाचा - चंद्रपुरात युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या; कारण अस्पष्ट