चंद्रपूर - जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्यहाडखुर्द उपवनक्षेत्रातील शिर्शी बिट परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वन्यजीवांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्यहाडखुर्द उपवनक्षेत्रातील शिर्शी बिट परिसरात काही दिवसांपूर्वी रानडुक्करांची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी वनविभागाने सहा जणांना अटक केली होती. त्यामुळे या परिसरात वन्यजीवांची शिकार केली जाते हे समोर आले होते.
आज काही व्यक्तींना एका जाळ्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती वनविभाग सावली यांना देण्यात आली त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी रवाना झाले.
धाडे यांनी चंद्रपूर येथील वरिष्ठ विभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानूसार वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ही घटना नेमकी कधी घडली, बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. हे जाळे कोणी लावले याचा शोध वनविभाग घेत आहे.