चंद्रपूर - कोविड-१९ कोरोना विषाणूच्या मृत्यू तांडवाने जग हैराण झाले आहे. देश व राज्यातही याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. जिल्ह्यातही कोरोना विषाणूबाधितांचा आकडा ५८० वर पोहचला आहे. याचे लोन बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीमुळे चिमूर तालुक्यातही पोहोचले आहे. आज घडीला २० व्यक्ती कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. लॉकडाऊनमध्ये मिळालेली शिथीलता यामुळे तथा कोरोना चाचण्या वाढविल्याने आकडा वेगाने वाढत आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रतिंबधाकरीता अतिशीघ्र निदान, उपचार वेळेवर करण्यासाठी जिल्हयातील कोविड मदत केंद्रात अँटीजेन टेस्ट केंद्र उघडण्यात आले. चिमूर येथील कोविड मदत केंद्रात २o जुलैला अँटीजेन टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले. त्यावेळेस ३५ चाचणी कीट उपलब्ध करूण देण्यात आल्या. त्यांनतर पुन्हा ४००़ कीट उपलब्ध करून देण्यात आल्या. या केंद्रात आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे तथा ज्यांना ताप, सर्दी व खोकला आहे अंशाची या केंद्रात चाचणी घेण्यात आली.
२ आगस्टपर्यंत ४२५ चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी ५ व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र आता या अँटीजेन टेस्ट किटच संपल्याने झटपट होणारे कोरोना संसर्गाचे निदान काही काळा करीता थांबले आहे. त्यामुळे स्वॅब नमूने चंद्रपूर येथेच तपासणी करीता पाठवावे लागणार आहेत. चिमूर येथील कोविड मदत केंद्रात सुरु करण्यात आलेल्या अँटीजेन टेस्ट सेंटरमधील किट संपलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा किटची मागणी केली असून गुरूवार ६ ऑगस्टला उपलब्ध होणार असून ७ आगस्टपासून पुन्हा अँटीजेन टेस्ट सुरू होणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय चिमूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गो.वा.भगत यांनी दिली.