चंद्रपूर : जिवती तालुक्यातील अंधश्रद्धेच्या नावाने सात वृद्धांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेची शाई सुकते न सुकते तोच पुन्हा तशाच घटनेच्या पुनरावृत्तीमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून जमावाने भाऊ, बहीण आणि आईला जबर मारहाण केली. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दुसऱ्या घटनेमुळे जिल्ह्यातील अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जमावाने मारहाण केल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेची तोंडी फिर्याद इंदिराबाई कामठे (वय 70) यांच्या वतीने 1 सप्टेंबरला देण्यात आली.
जादुटोणा करतो म्हणून दांडक्याने मारहाण
31ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी इंदिराबाई यांचा मुलगा अशोक कामठे (रा.मिंडाळा (टोली)) हा जादूटोणा करतो, या कारणावरून आरोपी प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम राहणार (सर्व रा.मिंडाळा (टोली)) व मयुरी सडमाके आणि तिच्या आईने इंदिराबाई हिच्या मुलीला हातांबुक्यांनी मारहाण केली. सोबत आरोपी पिल्ला आत्राम व प्रमोद सडमाके यांनी अशोक कामठे याला नागभीड येथून जबरदस्तीने दुचाकीवरून मिंडाळा येथे आणले. येथे आणून एका घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला दोरीने बांधले. त्यास बॅटने व बांबूच्या काठीने मारून जखमी केले. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या 70 वर्षीय इंदिराबाई यांनाही काठीने मारहाण करण्यात आली.
आरोपींवर गुन्हा दाखल
या दिवशी इंदिराबाईंकडे पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जाण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. अखेर कशातर दुसऱ्या दिवशी त्या आपल्या मुलीला घेऊन नागभीड पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींविरुद्ध 330/2021 भादवी कलम 143, 147, 148, 149, 452, 324, 342, 363, 368, 323 सह कलम 3 (1)(2) तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद मडामे करत आहेत. घेटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलिसांनी पोहचून आरोपींना ताब्यात घेतले.
यापूर्वीची घटना
21 ऑगस्टला जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील सात लोकांना जादूटोणा केल्याच्या संशयावरुन भर चौकात दोरीने बांधून क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. यात वृद्ध महिला आणि पुरुषांचा देखील समावेश होता. ही घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी पीडित लोकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
हेही वाचा - बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन