चंद्रपूर Janvikas Sena Agitation : शहरातील विविध पाच चौकात कारंजाचे बांधकाम आणि उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला होता. यानंतर आज 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील महानगरपालिका इमारतीसमोर कथित घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रतिकात्मक आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. (Symbolic Arrest of Chandrapur MC Officers)
'ही' आहे जनविकास सेनेची मागणी : आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपींप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात बांधण्यात आले. सर्व प्रतिकात्मक अधिकाऱ्यांना मनपा इमारतीच्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस ठाण्याच्या दिशेने नेण्यात आले. या आंदोलनात मनिषा बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी, सचिन आक्केवार, अमुल रामटेके, योगेश निकोडे इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फाउंटेन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या घोटाळ्यासाठी जबाबदार संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे.
विद्यमान नेते आता का बोलत नाही धुळीच्या प्रदूषणाने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला शासनाकडून चार कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला. धूळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी कारंजे लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची निविदा काढली. चौकात कारंजे लावून धूळ कमी करण्याचा जावईशोध चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी लावला. आजपर्यंत मनपातील करोडो रुपयांचे जवळपास पंधरा घोटाळे पुराव्यानिशी उजेडात आणले गेले. मात्र, एकाही घोटाळ्याच्या विरोधात स्थानिक आमदार, पालकमंत्री किंवा विरोधी पक्ष नेते का बोलत नाही? याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.
हेही वाचा: