चंद्रपूर - महापालिकेचे कचरा संकलन कंत्राट वादग्रत ठरले आहे. स्वयंभू नामक कंपनीचे कंत्राट रद्द करून त्याच कंपनीला जास्त दरात कंत्राट मंजूर करण्यात आले. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली असून लवकरच चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे कचरा संकलन घोटाळा प्रकरण
पूर्वीच्या कंपनीचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कचरा संकलनाच्या संबंधात निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये 6 पैकी दोन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या बाद झाल्याने चार कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीने सर्वात कमी म्हणजे 1 हजार 700 रुपये प्रति टन कचरा यानुसार किंमत लावली होती. कंपनीने सर्व आर्थिक गणित जुळवूनच ह्या कंत्राटाची निविदा भरली. मात्र, इतक्या कमी किमतीत हे काम होऊ शकत नाही हे कंपनीच्या आधी स्थायी समितीला कळले. त्यामुळे समितीनेच ही निविदा रद्द केली. यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात नव्याने निविदा मागविण्यात आल्या. यात स्वयंभू कंपनीला 2 हजार 500 रुपये प्रतिटन याप्रमाणे कचरा संकलनाचे कंत्राट देण्याला मंजुरी देण्यात आली. कचरा संकलनाची अद्यावत सुविधा आणि कामगार कायद्यानुसार कामगारांचे वेतन या बाबी समोर ठेऊनच निविदा मागविण्यात आल्या. मग याचे आर्थिक गणित जमवूनच स्वयंभू कंपनीने 1 हजार 700 रुपये प्रतिटन याप्रमाणे निविदा भरली असे म्हणायला हरकत आहे. तसेच निविदा प्राप्त झाल्यावर निविदा सादर करणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेतली जाते ज्याला 'प्रिबीड मिटिंग', असे म्हणतात. या बैठकीत आयुक्त आणि संबंधित विभागाचे प्रमुख असतात. यावेळी कंत्राटासंबंधी अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा होते. यावेळीही बाब कंपनीच्या लक्षात आली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वयंभू कंपनीने हा प्रताप केल्यावर पून्हा निविदा मागविण्यात आल्या. पैसे देऊन याची जाहिरातबाजी करावी लागली. यात दोन महिन्यांचा वेळ वाया गेला. मागच्या कंपनीला दोन महिन्याचे कंत्राट वाढवून देण्यात आले. त्यात पालिकेच्या पैशाचा नाहक अपव्यय झाला. अशावेळी कंपनीला वगळता आले असते. मात्र, याच स्वयंभू कंपनीला पून्हा संधी देण्यात आली. यावेळी 2 हजार 500 प्रमाणे त्यांना काम देण्यात आले. त्यामुळेच या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला, असा आरोप करण्यात आला. स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी याबाबतची तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी त्यात केली होती. रविवारी (दि. 20 डिसें.) शिंदे चंद्रपुरात पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. याबाबत तक्रार प्राप्त झाली असून याची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कचरा संकलनाचे कंत्राट भविष्यात गाजणार आहे.
हेही वाचा - कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन वेळेवर पगारासाठी नगर परीषदेपुढे ठिय्या