चंद्रपूर - वनवैभवाने संपन्न असलेल्या धाबा वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांत वन्यजीवांची शिकार होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच याच परिसरात उच्च दर्जाच्या सागवानाची तस्करी देखील जोरात सुरू आहे. राजुर्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे धाबा परिक्षेत्राचा प्रभार आहे. मात्र त्यांचे धाबा वनक्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत धाबा वनपरिक्षेत्रासाठी स्वंतत्रपणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी, अशी मागणी जोर जोर धरू लागली आहे.
गोंडपिपरी तालुक्याला मोठे वनवैभव लाभले आहे. वाघ, बिबट्या, अस्वल आणि अनेक दुर्मीळ प्राणी या वनक्षेत्रात आहेत. मध्य चांदा अंतर्गत येणा-या धाबा वनपरिक्षेत्रातील सुकवासी आणि गोजोलीत उच्च प्रतीचे सागवान आहे. नेहमीच या सागवानावर तस्करांचा डोळा राहिला आहे. अशावेळी वनविभागाची कार्यवाही मात्र नाममात्र आहे. धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर हे सेवानिवृत्त झाल्यापासून धाबा वनपरिक्षेत्र प्रभारी अधिका-यांच्या भरवशावर सुरू आहे. राऊतकर यांच्यानंतर वड्डेटीवार यांना या क्षेत्राचा प्रभार देण्यात आला होता. यानंतर आता राजूरा वनपरिक्षेत्राधिकारी विदेशकुमार गलगट यांच्याकडे धाबा वनपरिक्षेत्राधिका-याचा प्रभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, धाबा वनपरिक्षेत्राकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अशावेळी वन्यजीवांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांत या वनक्षेत्रात शिकारी व वन्यजीवांच्या मृत्यूसंख्येत कमालीची वाढ झालीय. सागवान तस्कर उच्च प्रतीच्या सागवानावर टपून आहेत. अशात प्रभारीच्या खांद्यावर क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांत गोजोली येथे सागवान तस्करीचा प्रकार समोर आला. तर दोन दिवसांपूर्वी चितळाच्या शिकारीची घटना घडली. जंगलाच्या सुरक्षेसाठी अलर्ट न राहता वनक्षेत्रातिल कर्मचारी केवळ स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर कार्यवाही करतात.
हा गंभीर प्रकार लक्षात येताच एका वन्यजीवप्रेमीने थेट सीसीएफकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर कर्मचा-यांमध्ये कमालीची धास्ती पसरली होती. पण काही दिवस लोटल्यानंतर पुन्हा 'जैसे थे' स्थिती आहे. धाबा वनपरिक्षेत्रात वन्यजींवाची सुरक्षा धोक्यात आली असताना चंद्रपुरातील वरिष्ठ वनअधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे धाबा वनपरिक्षेत्राला स्वतंत्र अधिकाऱ्याची मागणी होते आहे.