चंद्रपूर - चिमूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या भीसी पोलीस स्टेशन क्षेत्रातील डोमा शेत शिवारात मोठया प्रमाणात हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. या ठिकाणी काही दिवसांपासून मोहाच्या फुलांपासून दारू बनवण्यात येत होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी दोघांना अटक करण्यात आली असून ६ लाख २८ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असल्याने या ठिकाणी मोहाच्या फुलांपासून बनवलेली हातभट्टीची दारू तयार करण्यात येते. सध्या अशा तस्करांचे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे डोमा शेतशिवारात अवैधरित्या दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभळे यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोपींना रंगेहात पकडले.
पोलिसांना घटनास्थळावर डोमा येथील प्रणय ओमप्रकाश डांगे (वय ३६) आणि मारोती मंगरू मून (वय ४५) हे दोघे दारू काढताना आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून दारुसाठा, मोहासडवा व अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.