चंद्रपूर - मी अपक्ष जरी लढत असलो तरी अजूनही मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भाजपच्या सर्व नेत्यांविषयी अजूनही माझ्या मनात सन्मान आहे. मात्र, आमदार बंटी भांगडिया हे केवळ भाजपच्या चिन्हापुरते मर्यादित आहेत. मात्र, त्यांनी आपली युवाशक्ती संघटनाच चालविण्याचे काम केले. म्हणून भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण अपक्ष निवडणूक लढवत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे बंडखोर नेते धनराज मुंगळे यांनी दिली.
हेही वाचा - चिमूर विधानसभेत तिरंगी लढत; कोण मारणार बाजी?
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या धनराज मुंगळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण अजूनही भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहोत आणि त्यांना कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा, बहुजनांना न्याय मिळावा म्हणून आपण मैदानात उतरलो आहोत. ही लढाई आता जनतेची झाली आहे आणि त्यात आपला विजय निश्चित आहे, असेही मुंगळे म्हणाले. निवडून आल्यास आपण रोजगारनिर्मितीसाठी काम करणार आहोत, असेही त्यांचे म्हणणे आहे.