चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. 24 तासांत येथे वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा बळी गेला आहे. सरडपार या गावात रात्री अंगणात झोपलेल्या इसमाला बिबट्याने ठार केले. तर सकाळी पवनपार येथे मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करीत ठार केले. या घटनांमुळे चिंता वाढली आहे.
पाण्याच्या शोधात मोर्चा लगतच्या गावाकडे - उन्हाळा आला की वन्यजीव पाण्याच्या शोधात आपला मोर्चा लगतच्या गावाकडे वळवितात. या शोधात मानव वन्यजीव संघर्षाचे प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात वाढत आहे. सध्या चंद्रपूर जिल्हा तापमानात उच्चांक गाठत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रात्री घराबाहेर अंगणात झोपत असतात. मात्र अंगणात झोपणे या उन्हाळ्यात कठीण झाले आहे. सोमवारी रात्री सिंदेवाही तालुक्यातील सरडपार (चक) येथे रात्री अंगणात झोपलेल्या 70 वर्षीय माणिक बुद्धा नन्नावरे यांच्या जीवावर बेतले. माणिक यांचेवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवीत ठार केले. सदर घटनेने सरडपार येथे चांगलीच दहशत पसरली आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करावा - वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. तशीच दुसरी घटना तालुक्यातील पवनपार बिटात सकाळी 7 वाजता घडली. सध्या ग्रामीण भागात मोहफुले जमा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात सध्या मोहफुले जमा करून उदरनिर्वाह केला जात आहे. त्यामुळेच ग्रामस्थ पहाटे लवकर जंगलात जाऊन मोह फुले जमा करतात. नेहमीप्रमाणे पवनपार बिटात मोह फुले वेचायला ग्रामस्थ गेले असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सुरेश लोनबले वय 50 राहणार पवनपार याला ठार केले.