चंद्रपूर - कौटुंबिक परिस्थितीला कंटाळून गावातील एका व्यक्तीने चक्क बस थांब्यावरच संसार मांडला आहे. तसेच त्याने जनावरांसाठी बसस्थानक परिसरात गोठाही उभा केला असून, कुटुंबातील मतभेदांमुळे या व्यक्तीने बस थांब्याचा आसरा घेतला आहे. यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव हेटी येथील बसथांब्यावर प्रवाश्यांना उघड्यावर बसून वाट पाहण्याची वेळ आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव हेटी हे गाव धाबा-पोडसा मार्गावर आहे. या गावाजवळ असलेल्या कुडेनांदगाव, टोले नांदगाव, चेक नांदगाव या ठिकाणच्या नागरिकांना बस पकडण्यासाठी नांदगाव हेटीचा बस थांबा गाठावा लागतो. मात्र, सध्या या बस थांब्यात गावातील येलमुले नामक व्यक्तीने स्वत:चा संसार मांडला आहे. यामुळे प्रवाश्यांना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे.
येलमुले यांची आर्थिक स्थिती बेताची असून त्याच्याकडे शेती आणि पाळीव जनावरे आहेत. तसेच या व्यक्तीचा दूध विकण्याचा व्यवसाय आहे. मात्र, कौटुंबिक मतभेद असल्याने येलमुले यांनी बसस्थानकात अतिक्रमण करून संसार थाटला आहे असून जनावंरासाठी गोठा उभारला आहे.