चंद्रपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचललेली आहेत. देशभरात टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीत हॉटेलमधून पार्सल घेण्याची परवानगी आहे. मात्र, हॉटेलमध्ये बसवून ग्राहकांना सुविधा पुरविण्याची परवानगी नाही. अशात राजुरा येथील हॉटेल मालकाला ग्राहकांना शटर बंद करून नाश्ता देणे महागात पडले आहे. नगरपरिषदेने या हॉटेल मालकाला दोन हजारांचा दंड ठोठावला आहे.
राजूरा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या नागराज कॅफेमध्ये शटर उघडून ग्राहकांना नाश्ता देत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरेश पुणेकर व राजू लांडगे याने नागराज कॅफे हॉटेल गाठले. या मालकाची चौकशी केली. सुरुवातीला मालकाने हॉटेल उघडून नाश्ता दिला असल्याची बाब नाकारली. मात्र, लोक नाश्ता करत असल्याचे फोटो दाखवल्यानंतर त्याने आपली चूक मान्य केली आणि दोन हजारांचा दंडही भरला.
कोरोनाचा संकटात हॉटेल व्यवसायिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य व स्वच्छता विभागाचे अभियंते संकेत नंदवंशी यांनी केले आहे.