चिमूर (चंद्रपूर) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता उद्योगधंदे, व्यवसाय आस्थापना बंद आहेत. या काळात पानटपऱ्या बंद असल्याने खर्रा शौकीनांची मोठी पंचायत झाली असून पान टपरी धारकही बेरोजगार झाले आहे. यामुळे खर्रा व्यवसायिक घरीच खर्रा बनवून ग्राहकांना घरपोच देत असल्याने चिमूर तालुक्यात खर्रा व्यवसाय हा गृहोद्योग बनत चालल्याचे चित्र दिसत आहे.
विदर्भामध्ये स्त्री, पुरुष, लहान, मोठ्यांना खर्ऱ्याचे व्यसन जडले आहे. ज्यामूळे शहर, गाव, वस्ती आणि गल्ली बोळात पानटपऱ्या दिसतात. मोठ्या प्रमाणात तंबाखु मिश्रित सुपारी म्हणजेच खर्रा चघडल्याने कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामूळे सुंगधित तंबाखू, गुटखा व खर्रा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही पानटपऱ्यांतून विक्री पानटपरीच्या माध्यमातून विक्री सुरुच होती. टाळेबंदीमुळे पानटपऱ्या बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली हेती.
पण, पानटपरी चालकांची आर्थिक गरज व खर्रा शौकिनांची वाढती मागणी यामुळे चिमूर तालुक्यात पुन्हा खर्रा विक्री सुरु झाली. एवढेच नाही तर ग्राहकांना त्यांच्या मागणी प्रमाणे घरपोच खर्रा पुरविण्यात येत आहे. घरातील सर्वजण मिळून हा खर्रा बनवत आहे. त्यामुळे खर्रा हा गृहोद्योग बनत चालला आहे.
चिमूर तालुक्यातील अनेक पोलीस, महसुल, स्थानीक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱ्यांसोबत कर्मचारी हे खर्रा शौकीन आहेत. याचा फायदा तंबाखु, सुगंधीत सुपारी विक्रेते घेत आहेत. पानटपरी वाल्यांकडून खर्रा पाचपट महाग विकला जात आहे. तरिही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा - लक्कडकोटमध्ये पोलिसांकडून दहा लाखांची सुगंधित तंबाखू जप्त