चंद्रपूर - शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या नवतपा सुरू असून पुढील काही दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शहराचे तापमान उन्हाळ्यात 49 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. जेव्हा नवतपा सुरू असतो, त्यात सर्वाधिक तापमानाची वाढ होत असते. सध्या नवतपा सुरू आहे. म्हणजे, नऊ दिवस तापमान उच्चतम पातळीवर जात असते.
मागच्या वर्षी चंद्रपूर शहराचे तापमान हे जागतिक पातळीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. याही वर्षी शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 23 मे रोजी चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते. 24 मे रोजी 46.6 तर, 25 मे रोजी 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. यावरून, चंद्रपूरचे तापमान हे दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसांत हे तापमान आणखी वाढणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे लोक कमी प्रमाणात बाहेर पडताहेत. मात्र, तरीही बाहेर पडताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.